Ad will apear here
Next
कोंडगाव-साखरप्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी
काजळी नदी व त्यापलीकडे भवानी मंदिर

रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव-साखरपा हे कोकणातल्या इतर गावांप्रमाणेच एक लहानसं गाव. आता याला एक शहरवजा गावही म्हणता येईल. या आपल्या गावालाही एक ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली दिसून येते. कोंडगाव व साखरपा या गावांचा बहुतांश वेळा एकत्रितपणेच उल्लेख केला जातो; पण खरं पाहायला गेलं, तर ही दोन्ही गावं पूर्वापार वेगवेगळी आहेत. महसुलीदृष्ट्यादेखील या दोन्ही गावांची कागदपत्रं पूर्वीपासूनच वेगवेगळी असून, या दोन्ही गावांचे स्वतंत्र उल्लेखही जुन्या दस्तऐवजांत आढळून येतात. 

कोंडगाव-साखरपा ही गावे काजळी नदीच्या उत्तर तीरावर वसलेली आहेत. आंबा घाटाकडून येणारी काजळी नदी व विशाळगडाकडून येणारी गड नदी यांचा साखरपा येथे संगम होतो व येथून काजळी नदी या नावानेच ही नदी रत्नागिरीत भाट्याच्या खाडीतून समुद्राला जाऊन मिळते. या गावांच्या एकत्रितपणे सीमा बघितल्या, तर या गावांच्या पूर्वेला दखिन हे गाव, पश्चिमेला मेढे, मोर्डे ही गावं, उत्तरेला वांझोळे, कासारकोळवण, बोंड्ये, निवधे ही गावं, तर दक्षिणेला काजळी नदी असून, त्यापलीकडे मुर्शी, भडकंबे व पुर्ये ही गावं आहेत. 

आपल्या गावाला साखरपा हे नाव का पडलं असावं, याबाबत सध्या तरी नक्की अशी काही माहिती नाही. परंतु कोंडगाव हे नाव का पडलं असावं, याबाबत मी एक तर्क केलेला आहे. कोंडगावची भौगोलिक रचना बघितली, की लक्षात येतं, की या गावाच्या चारही दिशांना डोंगररांगा आहेत. चारही बाजूंना उंच डोंगररांगा, आणि त्यांच्या मध्यभागी खोलगट भाग, ज्याला आपण ‘कोंड’ असे म्हणतो, या मधल्या कोंडात हे गाव वसलं असल्याने, याला कोंडगाव असं नाव पडलं असावं, असा माझा एक तर्क आहे. अर्थात हा तर्क बरोबर असेलच, असं नाही. 

गद्धेगळ

साखरपा व कोंडगावच्या सीमेवर एक उभी शिळा आहे. या शिळेला ‘गडदू’ (अर्थात गद्धेगळ) असं म्हटलं जातं. हा गडदू साधारण बाराव्या ते चौदाव्या शतकातला असावा, असं समजतं. तसंच, साखरपा पंचक्रोशी परिसरात अनेक वीरगळही (वीर पुरुषांच्या स्मरणार्थ कोरलेल्या शिळा) सापडतात. त्याआधारे, आपल्या गावाला किमान सहाशे ते आठशे वर्षांची पार्श्वभूमी आहे, असं आपण मानू शकतो. 

व्यापार आणि कोंडगाव-साखरप्याचा संबंध पुरातन मध्ययुगीन काळापासून आहे. विजापूरचा इब्राहिम आदिलशहा दुसरा (अबुल मुझफ्फर इब्राहिम आदिल शाह जगद्गुरू बादशहा) याने आजच्या रत्नागिरी तालुक्यातील हरचिरी या गावाजवळ, काजळी नदीच्याच तीरावरच्या दोन गावांचं शिवार (जंगल) काढून नवीन व्यापारी बंदर निर्माण केलं. त्याचं नाव इब्राहिमपट्टण होय. त्या बंदरावरून व्यापार चालत असे. त्या बंदराला उतारपेठ पाहिजे, म्हणून आजच्या आपल्या कोंडगाव, साखरपा, भडकंबे, पुर्ये इत्यादी गावांच्या जमिनी एकत्र करून ‘पेठ ईभ्रामपूर’ (पेठ इब्राहिमपूर) ही नवीन वसाहत वसवली आणि या वसाहतीत कसबे देवरुख व कसबे प्रभानवल्ली येथील वाणी, सोनार इत्यादी व्यापारी आणले. ही एक व्यापारी पेठ होती. त्यानंतर व्यापाराच्या अनुषंगाने येथे कुलकर्णी, पोतदार, शेट्ये, महाजन इत्यादी पदं निर्माण करून, त्यांचे विविध अधिकार वगैरे निश्चित करण्यात आले. पुर्यातील भवानी मंदिर परिसर/तुळापूर, भडकंब्यातील पेठवाडी व कोंडगाव-साखरप्यातील साधारण गावठाणाचा भाग हा या पेठ इभ्रामपूरमध्ये मोडत असे. पेठ इभ्रामपूरला स्वतंत्र गावाचं अस्तित्व होतं, असं आपल्याला दिसून येतं. ब्रिटिश काळात ही पेठ महसुली सोयीकरिता कोंडगाव, साखरपा, पुर्ये, भडकंबा या गावांत विभाजित होऊन विलीन झाली असावी. 

विजापूरचा इब्राहिम आदिलशहा दुसरा

औरंगजेबाचा मुलगा अकबर दुसरा याने आपल्या पित्याविरुद्ध बंड केलं होतं. त्या वेळी सन १६८१-८२ च्या दरम्यान साधारण वर्षभर तो साखरप्यात वास्तव्यास होता, असे उल्लेख दिसून येतात. विशाळगडाच्या अमलाखालील गावांपैकी काही गावांचा महसुली कर हा साखरप्याच्या फडावर जमा केला जात असे, असाही उल्लेख सापडतो. 

सन १८११च्या सुमारास श्रीमंत दुसरे बाजीराव पेशवे कोकणात आले असताना, विशाळगडचे श्रीमंत भगवंतराव तथा अप्पासाहेब पंतप्रतिनिधी यांची व श्रीमंत पेशव्यांची साखरपा येथे भेट झाल्याचा उल्लेख मिळतो. या भेटीत पेशव्यांनी पंतप्रतिनिधींचा मोठा सत्कार वगैरे केल्याची नोंद आहे. 

कोंडगावात नदीच्या तीरावर जुव्यामध्ये एक दगडी चौथरा आढळतो. तो चौथरा गढी या नावाने ओळखला जातो. या गढीमधून विशाळगडाचाच एक बुरुज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माचाळला निशाण दाखवून, निरोप पाठवला जात असे, असं वडीलधाऱ्या मंडळींकडून सांगण्यात येतं. 

विशाळगडाची एक चौकी साखरप्यात होती. सन १८४३मध्ये गडकऱ्यांनी असंतोषाने जे बंड केलं, त्यावे ळी ही चौकी जाळली गेल्याचे उल्लेख सापडतात. आता ही चौकी म्हणजेच वर उल्लेख केलेली जुव्यातील गढी हीच असावी, असं वाटतं. 

कोंडगावामध्ये ब्रिटिश काळात शासकीय विश्रामगृह उभारण्यात आले, जे आज डाक बंगला या नावाने ओळखले जाते. आजूबाजूच्या पंधरा-वीस गावांतील पहिलीच शाळा हीदेखील आपल्या कोंडगावात सुरू झाली होती. ही पहिली मराठी शाळा कै. गोपाळ विठ्ठल केतकर यांनी तीन मार्च १८६९ रोजी खासगीरीत्या सुरू केली होती. १८८५ साली तिला सरकारी मान्यता मिळाली. आजही ही शाळा प्रसिद्ध असून, ‘जीवन शिक्षण विद्या मंदिर - केंद्र शाळा साखरपा क्र. १’ या नावाने गेली १५० वर्षं ज्ञानदानाचं कार्य करत आहे. 

गावात मराठी शिक्षणाची सोय होती. परंतु इंग्रजी शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना देवरुख किंवा रत्नागिरीला जावं लागत असे. तेव्हा सन १९५०च्या दशकात मूळचे कोंडगावतीलच असलेले व मुंबईतील प्रसिद्ध हिंद विद्यालयाचे संस्थापक असलेले कै. परशुरामभाऊ चिंतामण गद्रे यांनी गावात, ग्रामस्थांच्या सहकार्याने इंग्रजी काही इयत्तांची शिक्षणाची सोय केली होती. ही शाळा चालवण्यासाठी ग्रामस्थांचें एक मंडळदेखील स्थापन केलं होतं. पुढे काही कारणाने ही शाळा रयत शिक्षण संस्थेला चालवण्यासाठी दिली गेली. 

आपले हे कोंडगाव-साखरपा विशाळगडाच्या पायथ्याशी असल्याने विशाळगडाशी संबंधित अनेक ऐतिहासिक घराणी या गावांत वसली. या गावातले मूळचे कोण हे सांगणं मात्र खूप कठीण आहे. कारण बरीचशी घराणी या गावांत विविध कारणांनी बाहेरून आलेली आहेत. त्यापैकी कित्येक घराणी आजही या गावांत आहेत. त्या प्रत्येक घराण्याच्या इतिहासातून आपल्याला आपल्या गावाचा इतिहास कळून येईल. 

मी आपल्या गावाविषयी या ज्या ऐतिहासिक बाबी नमूद केलेल्या आहेत, तेवढाच आपला इतिहास आहे असं नव्हे; पण आजपर्यंत ज्या गोष्टी मला कळल्या, त्या आपणा सर्वांना कळाव्यात हाच हेतू. तरी प्रत्येकाने प्रयत्न केल्यास, त्या गोष्टी इथेदेखील मांडल्यास आपल्याला आपल्या गावाविषयी अजूनही अनेक विशेष गोष्टी कळतील, हे नक्की. 

- चैतन्य गिरीश सरदेशपांडे, साखरपा
मोबाइल : ९१३०३ ७६७१०
ई-मेल : chaitanyags1@gmail.com
.............
संदर्भ :
१) समग्र राजवाडे साहित्य खंड - ४
२) पं. बा. शिरवळकर लिखित ‘किल्ले विशाळगड’
३) अविनाश सोवनी संपादित ‘ऐतिहासिक बखरी खंड - १’ 
४) वि. वा. आठल्ये लिखित ‘आठल्ये घराण्याचा इतिहास’
५) रा. वा. केतकर संपादित ‘केतकर कुलवृत्तांत’ 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SXHACP
Similar Posts
कोंडगावातील मोहरम : जुन्या काळातील सर्वधर्मसमभावाचे उदाहरण इथे एक विचार मनात येतो, ज्या अंगणातून श्री ग्रामदेवतेची पालखी थाटात नाचत येते, त्याच अंगणात मोहरमचा सणदेखील तेवढ्याच थाटात रंगत होता, हे त्या काळचे सर्वधर्मसमभावाचेच एक उदाहरण नव्हे का?
अश्वारूढ तूं श्रीगणेश येसी... आमच्या गावी साखरपा (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) येथे गणपती घोड्यावर बसून येण्याची परंपरा आहे. त्या निमित्ताने...
श्री दत्तसेवा पतसंस्थेमार्फत संपूर्ण कोंडगावात आर्सेनिकम अल्बमचे वाटप करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कोंडगाव (साखरपा, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) येथील श्री दत्तसेवा पतसंस्थेमार्फत खबरदारीचा उपाय म्हणून आर्सेनिकम अल्बम ३० या होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप संपूर्ण कोंडगावमध्ये विनामूल्य करण्यात येणार आहे.
कोंडगाव येथे अकौंटन्सीचे मोफत मार्गदर्शन वर्ग कोंडगाव (साखरपा) : येथील श्रीराम देवस्थान आणि रत्नागिरी येथील उज्ज्वला अकौंटन्सी क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी मे महिन्यात कोंडगाव श्रीराम मंदिरात कॉमर्स शाखेबद्दल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language